
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पहलगामच्या डोंगराळ भागात काम करणारे टॅक्सी ड्रायव्हर, खेचर मालक आणि हमाल यांच्यासाठी आता ओळखपत्रांऐवजी क्यूआर कोड प्रणाली लागू करण्यात आली आहे. संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
क्यूआर कोड या नवीन प्रणालीअंतर्गत प्रत्येक अधिकृत कामगाराला गळ्यात एक क्यूआर कोड घालावा लागणार आहे. हा कोड कोणत्याही मोबाईलवरून किंवा गुगल लेन्सद्वारे स्कॅन करता येऊ शकतो. हा कोड स्कॅन केल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि व्यवसायाची संपूर्ण माहिती प्रवाशांना मिळेल. विशेष म्हणजे केवळ सुरक्षा दलाचे जवानच नाहीत, तर पर्यटकदेखील स्वतःच्या सुरक्षेसाठी हा कोड स्कॅन करून सेवा देणाऱ्या व्यक्तीची माहिती घेऊ शकतात. आतापर्यंत 4 हजार जणांना ओळखपत्रे देण्यात आलेली आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीची पोलीस प्रशासनाकडून चौकशी करण्यात येते. गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जातो. त्यानंतरच हे विशेष ओळखपत्र दिले जाते.


























































