
देशभरात तापमानात झपाट्याने वाढ होत असताना हिंदुस्थानातील वीजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. 24 एप्रिल रोजी देशातील एकूण वीज मागणीने 252 गीगावॅट (GW) चा उच्चांक गाठल्याची माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया यांच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी दुपारी 3.28 वाजता वीज मागणी 252.1 GW इतकी नोंदवली गेली. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 23 एप्रिल रोजी ही मागणी 240.1 GW इतकी होती. घरगुती तसेच व्यावसायिक क्षेत्रात वातानुकूलन (AC) यंत्रणांचा वाढता वापर हे यामागील मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.
याआधीचा विक्रम 30 मे 2024 रोजी 249.9 GW इतका होता. दरम्यान, उत्तर प्रदेशातील बांदा येथे शनिवारी सर्वाधिक तापमान नोंदवले गेले.
भारतीय हवामान विभाग यांनी यंदा तीव्र उन्हाळ्याचा अंदाज वर्तवला असून, केंद्राच्या ऊर्जा मंत्रालयाने या वर्षी वीजेची कमाल मागणी 271 GW पर्यंत जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट सुरू असल्याने येत्या दिवसांत वीज वापर आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तुलनेत, एप्रिल 2024 मध्ये कमाल वीज मागणी 235 GW इतकी होती. 2025 मध्ये तुलनेने सौम्य हवामानामुळे 12 जून रोजी 242.8 GW इतकी मागणी नोंदवली गेली होती, जरी ऊर्जा मंत्रालयाने 270 GW चा अंदाज व्यक्त केला होता. यावर्षी 9 जानेवारी रोजी उत्तर व ईशान्य हिंदुस्थानात तीव्र थंडीमुळे वीज मागणी 245 GW च्या पुढे गेली होती.
ग्रिड इंडिया यांच्या माहितीनुसार, एप्रिलच्या सुरुवातीला सौम्य हवामान आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे वीज वापर कमी होता. मात्र, 13 एप्रिलनंतर तापमान वाढू लागल्याने वीजेची मागणी सातत्याने वाढत आहे.
विशेष म्हणजे, 24 एप्रिल रोजी सुमारे 240 GW इतकी मागणी राहील, असा अंदाज ग्रिड कंट्रोलरने वर्तवला होता; मात्र प्रत्यक्षात ती त्यापेक्षा अधिक नोंदवली गेली. 27 एप्रिल ते 3 मे दरम्यान सुरुवातीला मागणी कमी राहील, पण 1 मे रोजी ती 246 GW पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, आयएमडीने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच मध्य हिंदुस्थानातील काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट वाढण्याचा इशारा दिला आहे. या परिस्थितीमुळे देशभरातील वीज वापरात आणखी वाढ होऊन लवकरच नवीन विक्रम नोंदवला जाऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.



























































