West Bengal Election Results 2026 – भाजपला आघाडी दाखवण्यासाठी निकाल देण्यास विलंब, तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. कृष्णनगर येथील मतमोजणी केंद्राबाहेर बोलताना त्यांनी मतमोजणी प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब आणि निकाल अपलोड करण्यात अनियमितता होत असल्याचा दावा केला.

महुआ मोईत्रा म्हणाल्या की, “आम्ही सर्व येथे उपस्थित आहोत. मला निवडणूक आयोगाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हा खेळ का खेळत आहात? 70 जागांच्या पहिल्या फेरीचे निकाल अजूनही अपलोड केलेले नाहीत, तसेच अनेक जागांचे निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.” त्यांनी आरोप केला की, भाजप आघाडीवर असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी हे जाणीवपूर्वक केले जात आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, “भाजप कधीही बंगाल जिंकू शकत नाही, विजय आमचाच होईल.” त्यांनी मतमोजणीतील विलंबावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितले की, लोकसभा निवडणुकीत याच वेळेत 10 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण होत असे, मात्र आता काही ठिकाणी फक्त 2 ते 3 फेऱ्याच मोजल्या जात आहेत.

महुआ मोईत्रा यांनी सर्व मतमोजणी प्रतिनिधी आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपल्या ठिकाणी ठामपणे बसून राहण्याचे आवाहन केले. “मतमोजणी सुरू असताना कुणीही जागा सोडू नये. आम्हीच सरकार स्थापन करणार आहोत आणि ममता बॅनर्जी विजयी होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच निवडणूक आयोगावर टीका करत त्यांनी “थोडी लाज बाळगा, शेवटी तुमच्यावरच टीका होईल,” असेही म्हटले. 70 जागांचे डेटा अद्याप का जाहीर करण्यात आले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.