ट्रम्पने इराणविरोधात 50 हजार सैनिक उतरवले तर ममता दीदींना हरवायला मोदींनी अडीच लाख सैनिक आणले; संजय सिंह यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

”अमेरिकेने इराणविरोधात 50 हजार सैनिक उतरवले होते, मोदींनी ममता दीदींना हरवण्यासाठी तब्बल अडीच लाख सैनिक पश्चिम बंगालमध्ये तैनात केलेले, ही निवडणूक आहे की तमाशा” अशा शब्दात आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींना फटकारले आहे. पश्चिम बंगालच्या निकालावरून संजय सिंह यांनी एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला.

”हिंदुस्थान जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. तमिळनाडूत नवीन पक्ष टीव्हीकेला लोकांनी बहुमत दिलं आहे. पश्चिम बंगालमध्ये जे झाले त्यावर गोदी मिडिया मोठ मोठ्या बाता मारतील, मोदी शहांच्या निवडणूक नितीचे कौतुक होईल. पण बंगालमधल्या सगळ्या गोष्टींचे मूल्यांकन व्हायला हवे. भाजप व तृणमूलमध्ये तीन ते चार लाख मतांचे अंतर आहे. हे जे काही अंतर आहे ते खरं आहे. खरंच भाजप या फरकाने निवडणूक जिंकू शकत होती का? २७ लाख लोकांना मतदान करू दिले नाही. जर ते 27 लाख मतदार मतदान करण्यापासून वंचित ठेवले नसते तर एक वेगळा निकाल आज दिसला असता. दुर्दैवाने 27 लाख मतदारांचा मतदानाचा अधिकारापासून दूर ठेवले. हे लोकशाहीचे नाही तर लूटशाहीचा विजय आहे. पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाचे अडीच लाख सैनिक तैनात होते. अमेरिका इराणविरोधात 50 हजार सैनिक लढवते तर मोदींनी ममता दीदींना हरवायला अडीच लाख सैनिकांचा वापर केलाय. ही कुठली निवडणूक. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी देखील पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जींवरच टीका करत होते. त्यांनी देखील मतं खाल्ली. हा SIR च्या घोटाळ्याचा, ज्ञानेश कुमारच्या घोटाळ्याचा विजय आहे. निवडणूक आयोग ज्या प्रकारे दलाल बनून काम करत होते त्याचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय नाही”, अशी टीका संजय सिंह यांनी केली आहे.