
मुंबई ः पार्क केलेल्या ऑटो रिक्षा मास्टर कीच्या सहाय्याने चोरी करून पसार होणारा सराईत रिक्षाचोर ट्रॉम्बे पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून चोरीची रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. मानखुर्द गाव येथील न्यू इंग्लिश पब्लिक स्कूलसमोर अक्षय चाळके याने पार्क करून ठेवलेली रिक्षा चोरीला गेली. या प्रकरणी अक्षयने ट्रॉम्बे पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर उपनिरीक्षक नाणेकर, आव्हाड, पाटील, पवार या पथकाने तपास सुरू केला. घटना स्थळावरील खाजगी व शासकीय फुटेज तसेच नवी मुंबईमधील 31 ते 40 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर चोरटा नेरुळ, बेलापूर, उलवे परिसरात वावरत असल्याचे दिसून आले. पथकाने शिताफीने त्याचा माग काढत त्याला वेरूळच्या एलपी ब्रीज येथून ताब्यात घेतले.
नसरापूर घटनेमुळे कापूरहोळची यात्रा रद्द
भोर ः नसरापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ कापूरहोळ येथील ग्रामस्थांनी ग्रामदेवी जानुबाई यात्रेचे उर्वरित दोन दिवसांची यात्रा रद्द केली. या गावात यात्रेच्या आदल्या दिवशी पालखी काढली जाते. त्या दिवशी पालखी काढली. परंतु दुसऱया दिवशी नसरापूरची घटना घडल्याने यात्रा रद्द केली. याबाबत छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे वंशजांसह ग्रामस्थ व तरुण मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खारघरमध्ये डंपरच्या धडकेने वकिलाचा मृत्यू
पनवेल ः राडारोडा वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने आज संध्याकाळी एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यात 28 वर्षीय तरुण वकीलाचा जागीच मृत्यू झाला. महेश लोहार असे त्याचे नाव असून सेंट्रल पार्कच्या दिशेने जाणाऱया रस्त्यावर ही दुर्घटना घडली. या अपघातानंतर संतप्त जमावाने रास्ता रोको केला, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. दरम्यान डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खारघर सेक्टर 12 परिसरात राहणारा महेश लोहार हा आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात होता. त्यावेळी भरधाव वेगातील डंपरने मागून धडक दिली. या अपघातात अशोक हा डंपरच्या चाकाखाली चिरडला गेला. या अपघाताची माहिती कळताच नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली होती.



























































