ओशिवरा नाल्यावरील पूल धोकादायक, ‘व्हीजेटीआय’चा अहवाल 20 कोटींचा नवीन ब्रीज बांधणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओशिवरा नाल्यावरील पूल जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. याबाबतचा अहवाल ‘व्हीजेटीआय’ने दिला आहे. त्यामुळे या पुलाच्या जागी पालिका तब्बल 20 कोटी 5 लाख 18 हजार रुपये खर्च करून नवीन ब्रीज बांधणार आहे.

अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. पालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) विभागामार्फत महानगरपालिका हद्दीतील पुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी पश्चिम उपनगरात सल्लागार म्हणून मे. एससीजी कन्सल्टिंग सर्विसेस यांची नेमणूक करण्यात आली आहे. मे. एससीजी कन्सल्टिंग सर्विसेस यांनी पालिकेस दिलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालाच्या तपासाअंती पुलाचा स्लॅब हा धोकादायक असल्यामुळे वाहतूक पुलाचा स्लॅब तोडून पुनर्बांधणी करणे, तसेच पुलाचे बिअरिंग बदलणे, असे सुचविले आहे. त्यानंतर हा पूल पश्चिम उपनगरात लिंक रोडला जोडणारा महत्त्वाचा वाहतूक पूल असल्याने व पुलाची धोकादायक स्थिती पाहता पुनश्चः स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाने घेतला आहे.