गॅस, पेट्रोल-डिझेल पुरवून वापरा! वर्क फ्रॉम होम सुरू करा!! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली कोरोना काळाची आठवण… टेन्शन वाढवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘इराण युद्धामुळे जग संकटातून जात आहे. इंधनाचे दर वाढले आहेत. या संकटकाळात पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवून पुरवून वापरा. खासगी गाडय़ांऐवजी मेट्रोचा वापर करा आणि ‘वर्क फ्रॉम होम’सारख्या पर्यायांचा पुन्हा विचार करा,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला केले. यावेळी मोदींनी कोरोना काळाचा दाखला दिल्याने टेन्शन वाढले आहे.

तेलंगणामधील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हैदराबाद येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधनटंचाईचा धसका केंद्र सरकारने घेतल्याचे मोदींच्या भाषणातून स्पष्ट झाले. मोदींनी देशातील जनतेला इंधन बचतीचे धडे दिले. ‘पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या कमालीचे वाढले आहेत. पेट्रोल, डिझेल आणि गॅस आपल्याला आयात करावा लागतो. आपल्याकडे तेलाच्या विहिरी नाहीत. अशा वेळी या उत्पादनांचा वापर कमी केला पाहिजे. पेट्रोल-डिझेलच्या आयातीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी आहे आणि ती काळाची गरजही आहे. त्यामुळे पेट्रोलियम पदार्थांचा वापर जितकी गरज आहे, तितकाच करा,’ असे मोदी म्हणाले.

मोदींची तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भाजप प्रवेशाची ऑफर

नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना भाजप प्रवेशाची ऑफर देऊन टाकली. ‘गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने गुजरातला जितकी आर्थिक मदत केली तितकीच मदत तेलंगणाला द्यायला मी तयार आहे, मात्र तसे झाल्यास आता केंद्राकडून तेलंगणाला जे मिळतेय ते निम्मे होईल. तेलंगणाला जो विकास करायचा आहे तो करता येणार नाही. त्यापेक्षा तुम्ही माझ्याच सोबत या,’ असे मोदी म्हणाले.

मेट्रोने फिरा… परदेश प्रवास वर्षभर पुढे ढकला

  • ज्या शहरांमध्ये मेट्रो सेवा आहे तिथे मेट्रोनेच प्रवास करा.
  • खासगी गाड्यांचा वापर अपरिहार्यच असेल तर ‘कारपूलिंग’ (एका गाडीतून अनेकांचा प्रवास) पर्याय वापरा.
  • ज्यांच्याकडे विद्युत वाहने (ईव्ही) आहेत त्यांनी त्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
  • कोरोना काळात सुरू केलेले ‘वर्क फ्रॉम होम’, ऑनलाईन बैठका आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला प्रोत्साहन द्या.
  • परकीय चलन वाचवण्यासाठी परदेशातील विवाह सोहळे, परदेश प्रवास एक वर्षासाठी पुढे ढकला.
  • सुट्टय़ांसाठी परदेशात जाण्याऐवजी हिंदुस्थानातीलच एखाद्या चांगल्या ठिकाणाचा विचार करा.

सोने खरेदी करू नका!

‘सोन्याच्या खरेदीवर देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणावर खर्च होते. ते वाचवण्यासाठी पुढचं वर्षभर कुटुंबात कुठलाही कार्यक्रम असो, सोन्याचे दागिने किंवा सोन्याच्या इतर वस्तू खरेदी करू नका,’ असे मोदी म्हणाले.