हिंदुस्थानी सैन्याची मोठी झेप; स्वदेशी ड्रोन्स आणि UAV ने करता येणार अचूक लक्ष्यभेद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
indian-army-modernization-indigenous-drones-and-uav-ready-for-precision-strikes

हिंदुस्थानी सैन्याची ताकद आता अधिक मजबूत होणार आहे. अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी हिंदुस्थानी सैन्य दलाच्या ताफ्यात यूएव्ही-लाँचड प्रिसिजन गाइडेड म्युनिशन’ (ULPGM) आणि ‘अग्निका व्हीटीओएल-१’ (AGNIKAA VTOL-1) ‘फर्स्ट-पर्सन व्ह्यू’ (FPV) कामिकाझे ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे.

संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, अति उंचावरील क्षेत्रात अचूक क्षेपणास्त्र डागण्याच्या यशस्वी चाचण्यांनंतर, लष्कराच्या पश्चिम कमांडच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हैदराबादमध्ये या प्रणाली सुपूर्द करण्यात आल्या. यूएलपीजीएम (ULPGM) आणि अग्निका व्हीटीओएल-१ या दोन्ही प्रणालींची रचना, विकास आणि निर्मिती स्वदेशात करण्यात आली आहे. डीआरडीओ (DRDO) आणि अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस यांनी संयुक्तपणे विकसित केलेले यूएलपीजीएम हे या श्रेणीतील हिंदुस्थानचे पहिले स्वदेशी ‘लोइटरिंग म्युनिशन’ क्षेपणास्त्र आहे. ही प्रणाली ‘इमेजिंग इन्फ्रारेड’ (IIR) सीकरने सज्ज आहे आणि स्थिर तसेच धावत्या अशा दोन्ही लक्ष्यांना टिपण्यासाठी यूएव्ही डागली जाऊ शकते. या या यूएव्हीची मर्यादा २० किलोमीटरपर्यंत आहे, तर प्रत्यक्ष क्षेपणास्त्र मारा करण्याची क्षमता २.५ किलोमीटर आहे. ही प्रणाली दिवस आणि रात्र अशा कोणत्याही वेळेत काम करू शकते. ‘अँटी-जॅमिंग’ आणि ‘अँटी-स्पूफिंग’ क्षमतेमुळे ती जीपीएस-विरहित आणि कम्युनिकेशन यंत्रणा ठप्प असलेल्या वातावरणातही कार्य करण्यास सक्षम आहे. यूएलपीजीएममध्ये दोन किलो वजनाचा दारूगोळा वाहून नेण्याची क्षमता आहे.

दुसरी प्रणाली, अग्निका व्हीटीओएल-१, ही तिच्या वर्गातील हिंदुस्थानचा पहिला एफपीव्ही (फर्स्ट-पर्सन व्ह्यू) कामिकाझे ड्रोन असल्याचे सांगण्यात येत आहे. हा ड्रोन शहरी युद्ध, अरुंद जागा आणि खुल्या रणांगणावरील मोहिमांसाठी डिझाइन केलेले ‘अँटी-पर्सनेल प्रिसिजन-स्ट्राइक’ प्लॅटफॉर्म म्हणून विकसित करण्यात आला आहे. तो जीपीएस-विरहित वातावरणात कार्य करण्यास सक्षम आहे. अग्निका व्हीटीओएल-१ ने यशस्वी अधिकाधिक-उंची आणि ईडब्ल्यू (EW) चाचण्या देखील पूर्ण केल्या आहेत. यामुळे कठीण ऑपरेशनल भूप्रदेशात ही यंत्रणा तैनात करता येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे. या ड्रोनची मर्यादा पाच किलोमीटरपर्यंत आहे असून तो ३० मिनिटे हवेत राहू शकतो आणि त्याचा कमाल वेग ताशी ६० किमी आहे.

UAV आणि FPV यामध्ये फरक काय?

UAV (Unmanned Aerial Vehicle): याचा अर्थ, असे विमान किंवा वाहन ज्यामध्ये वैमानिक प्रत्यक्ष बसलेला नसतो. हे रिमोट कंट्रोलने किंवा प्रोग्रामिंगद्वारे (Autonomous) चालवले जाते. सर्व प्रकारचे ड्रोन हे ‘UAV’ या श्रेणीत येतात.

FPV (First Person View): याचा अर्थ यामध्ये ड्रोनवर बसवलेल्या कॅमेऱ्याचे थेट प्रक्षेपण (Live Feed) वैमानिकाला एका विशेष गॉगल्स (Goggles) किंवा स्क्रीनवर दिसते. जणू काही वैमानिक स्वतः ड्रोनच्या कॉकपिटमध्ये बसून तो उडवत आहे, असा अनुभव येतो.