
पारंपरिक पद्धतीने पूजा करीत असतानाचा व्हिडिओ मोबाईलच्या स्टेटसवर ठेवून आक्षेपार्ह मजकूर लिहून भावना दुखावणाऱ्या पोलिस शिपायावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. भिवंडी पोलिस उपायुक्त शशिकांत बोरेटे यांनी कारवाई केली आहे. अंकुश सानप असे कारवाई करण्यात आलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे.
कोनगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस शिपाई अंकुश सानप यांनी टेंभर गाव येथील गावदेवी यात्रेच्या दरम्यान पुजारी पारंपरिक पद्धतीने पूजा करीत असतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या स्टेटसवर ठेवून त्याखाली समाजाच्या भावना दुखावणारा मजकूर लिहिला होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी सानप यांना विचारणा केली असता त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा करून उद्धटपणाचे वर्तन केले.
याबाबत शांतिनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिस उपायुक्त शशिकांत बोरेटे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

























































