
दोघा मोटरमनचा एकाच दिवशी हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासन मोटरमनच्या आरोग्याबाबत गंभीर बनले आहे. मोटरमनवरील ताणतणाव कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, पुरेशा विश्रांती वेळेनुसार कामाच्या तासाचे नियोजन केले जाईल, अशी हमी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
गेल्या आठवड्यात अनुज प्रसाद सिंग आणि मोहसिन खान या दोघा मोटरमनचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यानिमित्ताने मोटरमनच्या त्रासदायी कामाचा प्रश्न ऐरणीवर आला. मंगळवारी चर्चगेट येथील मोटरमन लॉबीमध्ये आयोजित शोकसभेला पश्चिम रेल्वेचे सीनियर डीईई (ऑपरेशन) अंशुल बन्सल यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना हजेरी लावून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी अंशुल बन्सल यांनी मोटरमनवरील कामाचा ताण कमी करण्याबाबत मोटरमन व ट्रेन मॅनेजरना आश्वस्त केले. कर्तव्य बजावताना आरोग्य सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रशासन सहकार्य करेल. मोटरमनना तणावमुक्त करण्यासाठी पुरेशा विश्रांती वेळेनुसार कामाच्या तासाचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन बन्सल यांनी दिले.



























































