घोडेगावात कांद्याला एक हजारचा दर, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषी उत्पन्न बाजार समिती उपआवार घोडेगाव येथे आज झालेल्या लिलावात उन्हाळी कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत. आज उन्हाळी कांद्याला क्विंटलला अवघा एक हजार रुपये दर निघाला.

घोडेगाव बाजार समिती उपआवारामध्ये आठवडय़ातून दोन दिवस बुधवार व शनिवार कांद्याचे लिलाव पार पडतात. आज झालेल्या कांदा लिलावासाठी 115 वाहनांतून 21 हजार 545 गोण्या कांद्याची आवक झाली.

एक नंबर कांद्याला 1000 ते 1100 रुपये, तर दोन नंबरला 700 ते 800 क्विंटल भाव निघाला. तीन नंबरला 500 ते 600 रुपये, गोल्टा कांद्याला 400 ते 500, जोड, हलका डॅमेज 200ते 300 रुपये असे दर निघाले. कवडीमोल भावात कांदा विकला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्याला बसला.

अवकाळी पावसाचा फटका, तसेच प्रचंड तापमानामुळे कांदा खराब होत असल्याने कांद्याला उठाव नसल्याचे व्यापारीवर्गामध्ये बोलले जात आहे. भविष्यात कांद्याचे भाव वाढणार की नाही, याबाबत मोठी शाशंकता निर्माण झाली आहे.