विशेष – ‘नीट’ची रडकथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< डॉ. संजय गायकवाड

यंदाच्या वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ‘नीट-यूजी’ या प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आले आणि अखेर ही परीक्षा रद्द करण्यात आली. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून पेपरच्या सुरक्षिततेबाबत दावे केले असतानाही पेपर लीक होतो, याचा अर्थ व्यवस्थेतच उणिवा आहेत. त्या दूर कधी होणार, हा खरा प्रश्न आहे.

देशातील स्पर्धा परीक्षा व्यवस्था हा लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा निर्णायक टप्पा असतो. विशेषत वैद्यकीय शिक्षणासाठी घेतली जाणारी ‘नीट’ परीक्षा तर अनेक कुटुंबांच्या स्वप्नांचे केंद्र बनलेली आहे. डॉक्टर होण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करतात, पालक आपल्या आर्थिक मर्यादा ओलांडून कोचिंग, वसतिगृह, अभ्यास साहित्य आणि विविध प्रशिक्षणांवर मोठा खर्च करतात. अशा परिस्थितीत पेपरफुटीच्या प्रकरणामुळे ‘नीट-यूजी 2026’ची परीक्षा रद्द होणे, हा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर झालेला आघातच म्हणावा लागेल.

3 मे रोजी देशभरातील तब्बल 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या आशेने परीक्षा दिली होती. मात्र काही दिवसांतच प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनी वातावरण ढवळून निघाले. राजस्थानमधील प्राथमिक तपासात समोर आलेले ‘गेस पेपर’ आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील साम्य यामुळे संशय अधिक गडद झाला. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने परीक्षा रद्द करून प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मनात चिंतेचे काहूर उठले. पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द करणे क्रमप्राप्त असले तरी परीक्षार्थींचा त्यात दोष काय?

या संपूर्ण प्रकरणाने एक मूलभूत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे की, इतक्या कठोर सुरक्षा व्यवस्थेनंतरही प्रश्नपत्रिका फुटतात कशा? मल्टी-लेयर सुरक्षा, डिजिटल निगराणी, सीलबंद प्रोटोकॉल, फ्लाइंग स्क्वॉड अशा अनेक उपाययोजनांचा वारंवार उल्लेख केला जातो. परंतु प्रत्यक्षात पेपरफुटीची प्रकरणे थांबत नाहीत. याचा अर्थ समस्या केवळ परीक्षा केंद्रांपुरती मर्यादित नाही, तर प्रश्नपत्रिका तयार होण्यापासून ते वितरणापर्यंतच्या संपूर्ण साखळीत कुठेतरी गंभीर त्रुटी आहेत. प्रश्नपत्रिकांचे मुद्रण, साठवण, वाहतूक आणि वितरण या प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीची विश्वासार्हता हाही आता मोठा प्रश्न बनला आहे. गेल्या काही वर्षांत विविध प्रवेश आणि भरती परीक्षांभोवती निर्माण झालेल्या वादांमुळे या संस्थेच्या कार्यपद्धतीवर सतत प्रश्न उपस्थित झाले आहेत. देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था एम्स, जिपमर आणि इतर सरकारी महाविद्यालयांमधील प्रवेश ‘नीट’वर अवलंबून असताना, त्याच परीक्षेची निपक्षता संशयाच्या भोवऱ्यात अडकणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांचा रोष आता केवळ भावनिक प्रतिक्रियांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो संघटित मागणीत रूपांतरित होत आहे. अधिक कठोर सुरक्षा, स्वतंत्र देखरेख यंत्रणा, तांत्रिक पारदर्शकता आणि वेळोवेळी होणारे ऑडिट यांची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.

सीबीआय चौकशीची घोषणा ही काही प्रमाणात आश्वासक वाटत असली, तरी चौकशी ही अंतिम उपाययोजना ठरू शकत नाही. मूळ समस्या व्यवस्थेच्या रचनेत आहे. त्यामुळे केवळ दोषींना अटक करून प्रश्न सुटणार नाही. परीक्षा व्यवस्थेत मूलभूत सुधारणा आवश्यक आहेत. प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत मर्यादित प्रवेश, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने सुरक्षा विश्लेषण, डिजिटल ट्रॅकिंग, स्वतंत्र देखरेख संस्था आणि प्रत्येक टप्प्यावर जबाबदारी निश्चित करणारी प्रणाली उभारावी लागेल. त्याचबरोबर परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणेही अत्यावश्यक आहे.

परीक्षा रद्द झाल्यानंतर एनटीएने विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार नाही किंवा शुल्क परत दिले जाईल, असे सांगितले गेले आहे; मात्र प्रश्न केवळ आर्थिक भरपाईचा नाही. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा कालखंड यामुळे अनिश्चिततेत अडकून पडणार आहे. नवीन परीक्षा तारीख, निकाल, प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक सत्र यामध्ये होणारा विलंब संपूर्ण वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करतो. देशातील प्रतिभावान विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास टिकवून ठेवणे ही कोणत्याही शिक्षण व्यवस्थेची सर्वात मोठी जबाबदारी असते. प्रामाणिक परिश्रम करूनही आपल्याला आपण न केलेल्या चुकीचा भुर्दंड सोसावा लागतो, ही भावना बळावत गेली तर त्याचे परिणाम दूरगामी ठरू शकतात. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आता अपवादात्मक राहिलेल्या नाहीत. त्या सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे त्याकडे केवळ तात्पुरत्या उपायांनी पाहून चालणार नाही. आता गरज आहे ती कठोर, पारदर्शक आणि जबाबदार यंत्रणा उभारण्याची. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होणार नाही, अशी खात्री निर्माण करणे ही शासन आणि परीक्षा संस्थांची प्राथमिक जबाबदारी आहे.

2021 मध्ये जयपूरमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर पेपर लीक झाल्याचे समोर आले होते, तर 2024 मध्ये बिहारमधील पाटणा येथे परीक्षेच्या आदल्या रात्री विद्यार्थ्यांना एका खासगी शाळेत बोलावून प्रश्नपत्रिका पाठ करून घेतल्याचे पुरावे मिळाले होते. यानंतर केंद्र सरकारने 2024 मध्ये सार्वजनिक परीक्षा कायदा संमत करून पेपर फोडणाऱ्यांना 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूदही केली; पण आताच्या प्रकरणाने या कायद्याचे भय पेपरफुटीचे नेटवर्क चालवणाऱ्यांना राहिलेले नाही हे स्पष्ट केले आहे.

आजघडीला महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक ‘नीट’ परीक्षार्थी असलेले राज्य आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची मोठी संख्या, वाढलेली खाजगी महाविद्यालये आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा डॉक्टर होण्याकडे वाढलेला कल यामुळे परीक्षार्थींची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत राज्य बोर्डांमधून सर्वाधिक अर्ज करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र सातत्याने अव्वल स्थानी राहिले आहे. यंदा राज्यातून सुमारे 2.2 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले असून, उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील, पुणे, लातूर आणि कोल्हापूर यांसारखी शहरे ‘कोचिंग हब’ बनल्यामुळे शेजारच्या राज्यातील विद्यार्थीही महाराष्ट्रातून परीक्षा देण्यास पसंती देत आहेत. डॉक्टर घडवण्याची ही प्रक्रिया पुढे टिकवायची असेल तर ‘नीट’बाबत सातत्याने होणारे गैरप्रकार रोखावेच लागतील.