
चीनच्या ग्वांग्शी प्रांतातील लिउझोऊ शहराला मध्यरात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.2 इतकी मोजली गेली आहे. मध्यरात्री 12 वाजून 31 मिनीटांनी झालेल्या या भूकंपामुळे परिसरात मोठी घबराट निर्माण झाली. या नैसर्गिक आपत्तीत एका 63 वर्षीय पुरुषाचा आणि एका 53 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून अन्य बेपत्ता लोकांचा शोध अद्याप सुरू आहे.
चीनची सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ आणि स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुळे तब्बल 13 इमारती कोसळल्या. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली एक व्यक्ती अद्याप बेपत्ता असून तिचा कसून शोध घेतला जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांकडून रेल्वे रुळांची तातडीने पाहणी करण्यात येत आहे, ज्यामुळे रेल्वे वाहतुकीवर अंशतः परिणाम झाला आहे. मात्र, सुदैवाने परिसरातील फोन लाईन्स, वीज, पाणी, गॅस पुरवठा आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे सुरळीत आहे.
भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक सुरक्षिततेसाठी उंच इमारतींमधून बाहेर पळत सुटल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. भूकंप झालेल्या भागात कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्यांचे मोठे ढीग साचले आहेत. आपत्कालीन पथके, बचाव कार्य करणारे कर्मचारी आणि श्वानपथक ढिगाऱ्यांमधून वाचलेल्या लोकांचा शोध घेत आहेत.


























































