पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाडिक यांच्या दौऱ्यावेळी व्हीआयपी दर्शनासाठी दादागिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अधिक मास आणि मे महिन्याच्या सुट्टय़ा असल्याने देशभरातून लाखोंच्या संख्येने वारकरी भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे देवाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सात ते आठ तासांचा वेळ लागत आहे. व्हीआयपी दर्शन बंद आहे. मात्र, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक शेकडो कार्यकर्त्यांसह दर्शनासाठी आले. यावेळी मंदिर समितीने महाडिक आणि त्यांच्या दोन-तीन कार्यकर्त्यांना दर्शनाला सोडण्याची व्यवस्था केली. मात्र, आम्हा सगळ्यांनाच व्हीआयपी दर्शनासाठी सोडा यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. यामुळे भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

सोमवारी सायंकाळी शेकडो भाजपा कार्यकर्त्यांसह कृष्णराज महाडिक हे दर्शनासाठी आले होते. महाडिक यांच्यासोबत आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी व्हीआयपी गेटवर गर्दी केली. गोंधळ घालत मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस, सुरक्षारक्षक व कार्यकर्ते यांच्यामध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान, श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्वसामान्य भाविकांना लांबच लांब दर्शन रांगेत तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. मात्र, दुसरीकडे राजकीय सत्ताधारी पक्षाच्या लोकांना मिळणाऱ्या थेट दर्शन सुविधेमुळे भाविकांनी मंदिर समितीच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला आहे.