
रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा अनिवार्य करतानाच त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने पुढचे पाऊल टाकले आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाना तसेच बॅजकरिता सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची फेरतपासणी करण्याच्या सक्त सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार तत्काळ कार्यपद्धतीही लागू केली आहे.
ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाना मिळवण्यासाठी अनेक चालक बनावट कागदपत्रे सादर करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मराठी भाषा सक्तीपासून पळवाट शोधून काढण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिवहन विभागाने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाना व बॅजकरिता मोटार वाहन कायद्यानुसार सादर केलेल्या कागदपत्रांची फेरतपासणी करून 15 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत कार्यपद्धती (एसओपी) तत्काळ लागू करण्यात आली आहे. त्यानुसार ‘वायुवेग’ पथकामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची काटेकोर तपासणी करण्यात येणार आहे. परिवहन विभागाच्या या कठोर भूमिकेमुळे रिक्षा व टॅक्सीचालकांकडून कागदपत्रांमध्ये केल्या जाणाऱ्या ‘बनावटगिरी’ला चाप बसणार आहे.
परिवहन विभागाची ‘मराठी’साठी कार्यपद्धती
‘वायुवेग’ पथकाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील रिक्षा-टॅक्सीचालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळावी.
जर कोणताही परवाना बनावट वा खोटय़ा कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याचे निदर्शनास आले तर संबंधित परवाना रद्द करावा.
रिक्षा-टॅक्सीचालकांना दोन तास मराठीचे धडे
ज्या रिक्षा-टॅक्सीचालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे आढळून येईल त्या रिक्षा-टॅक्सीचालकांना दररोज दोन तास व्यावहारिक मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचे कौशल्य, दैनंदिन वापरातील मराठी शब्द व वाक्यरचना, वाहतूक, मार्गदर्शन केले जाणार आहे.
























































