
अष्टविनायकातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पालीवासीयांना सध्या ‘काळ्या पाण्या’ची शिक्षा भोगावी लागत आहे. नळातून चक्क दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून लवकरात लवकर शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी पालीतील नागरिकांनी केली आहे.
पाली शहराला अंबा नदीतून थेट कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो. सध्या अंबा नदीचे पात्र रसायनयुक्त सांडपाणी, कचरा आणि वाळू उपशामुळे प्रचंड प्रदूषित झाले आहे. धुंडीविनायक नगर परिसरात नळ सुरू होताच मोठ्या प्रमाणात जंतूयुक्त काळे पाणी आले. पाण्याला उग्र दुर्गंधी येत होती. मागीलवर्षीदेखील खडकआळी, बल्लाळेश्वरनगर आणि प्रबुद्ध नगरमध्येही असाच अनुभव नागरिकांना आला आहे.
२७ कोटींची योजना लालफितीत
पालीची लोकसंख्या आणि येथे येणारे हजारो भाविक लक्षात घेता २७कोटी रुपयांची शुद्ध पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मात्र ही योजना अद्यापही तांत्रिक कारणास्तव लालफितीत अडकली आहे. परिणामी शुद्धीकरणाविना थेट अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरवले जाते. नळांतून अनेकदा जिवंत साप, किडे आणि चिखल बाहेर येण्याचे प्रकार घडले आहेत.



























































