जर्जर इमारती झाल्या मृत्यूचा सापळा, उल्हासनगरमध्ये मुलाच्या डोक्यात लादी पडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या जर्जर इमारती मृत्यूचा सापळा तयार झाल्या आहेत. इमारतीच्या स्लॅब आणि भिंती कोसळण्याचे प्रकार दररोज अनेक ठिकाणी घडत आहेत. उल्हासनगरमध्ये खिडकीची लादी पडल्यामुळे एक चार वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कॅम्प क्रमांक ३ मधील पवई परिसरातील सरस्वतीनगर येथे राहणारा जगदीश नुपनारायण हा मंगळवारी सायंकाळी रोडवर खेळत होता. तितक्यात रोडच्या कडेला असणाऱ्या इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या खिडकीतील लादी जगदीशच्या डोक्यावर पडली. या अपघातात जगदीशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्रथम त्याला उल्हासनगर आणि कल्याण येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मुंबईतील वाडिया रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.