कर्नाटकात मोठी दुर्घटना, नदीत शिंपले शोधण्यासाठी गेलेल्या ८ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात एका गावातील ८ जणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे सर्वजण नदीत शिंपले शोधण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने एकामागून एक अनेक जण वाहून गेले. मृतांमध्ये ७ महिलांचा समावेश असून २ जण अद्याप बेपत्ता आहेत. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण नदीत उतरले आणि हळूहळू खोल पाण्याच्या दिशेने जाऊ लागले. मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा वेग किती असू शकतो याचा त्यांना योग्य अंदाज आला नाही. परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली आणि प्रवाह अत्यंत वेगवान झाला. पाण्याच्या या वेगवान प्रवाहात सुरुवातीला एक-दोन जण वाहून जाऊ लागले.

जेव्हा काही जण वाहून जात असल्याचे दिसले, तेव्हा इतरांनी त्यांना वाचवण्यासाठी स्वतः नदीत उड्या घेतल्या. मात्र पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, तेही त्यात अडकले. वाचवण्याच्या प्रयत्नात एकामागून एक अनेक जण बुडाले आणि वाचवायला गेलेले स्वतःच जीव गमावून बसले. पोलिसांनी आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढले असून त्यांची ओळख पटली आहे. हे सर्वजण शिराली गावातील रहिवासी आहेत.

दरम्यान, नदीत बुडालेल्यांपैकी ८ मृतदेह सापडले असले तरी, २ जण अद्याप बेपत्ता आहेत. पोलीस, बचाव पथक आणि स्थानिक नागरिक मिळून नदीत त्यांचा शोध घेत आहेत.