आता आणखी मुदतवाढ नाही, 15 ऑगस्ट ही तारीख फायनल, रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकावेच लागेल; चालकांच्या संघटनांना पुढाकार घेण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना ग्राहकांशी किमान व्यवहार करता येईल इतक्या प्रमाणात तरी मराठी भाषा 15 ऑगस्टपर्यंत आलीच पाहिजे. पुनः पुन्हा सांगणार नाही, 15 ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्ट फायनल, अशी तंबी देतानाच, मराठी शिकवण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचालकांच्या संघटनांनी पुढाकार घ्यावा, होईल तो खर्च सरकार देईल, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केले.

मंत्रालयात यासंदर्भात विशेष बैठक झाली. रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी भाषा सहज बोलता, समजता यावी यासाठी व्यापक मराठी शिक्षण अभियान राबविण्यात येईल असे सरनाईक यांनी सांगितले. परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह विविध रिक्षा व टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

रोज चार तासांचे प्रशिक्षण

चालकांना व्यावहारिक मराठी भाषा आत्मसात करता यावी यासाठी दररोज चार तासांचे ऑफलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. ऑनलाइन प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, पालघर आणि डहाणू या भागांत प्रारंभी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातूनही मराठी शिकविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सुमारे 4500 शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

 संभाषण कौशल्य शिकण्यासाठी एआयची मदत

हिंदी ते मराठी भाषांतर आणि सोपे मराठी संभाषण शिकण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ऑनलाइन अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून चालकांना मराठी शब्द, वाक्यरचना आणि दैनंदिन संवाद सहज शिकता येणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.