
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडी वेगाने घडत आहेत. अजितदादांनी अल्पसंख्याक चेहरा म्हणून विधान परिषदेवर संधी दिलेल्या इद्रिस नायकवाडी यांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे आदेश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ओएसडींकडून तसा निरोप नायकवाडी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याची चर्चा आहे.
पंधरा दिवसांपूर्वी इद्रिस नायकवाडी यांना राजीनामा देण्याबाबत सांगण्यात आले. राज्यपाल नियुक्त कोटय़ातून आमदारकी मिळालेल्या नायकवाडी यांनी त्यानंतर अद्यापपर्यंत राजीनामा दिलेला नाही. त्यांना राजीनाम्यासाठी सातत्याने दबाव आणला जात असल्याचीही चर्चा आहे. अजित पवार गटाच्या आमदारांची उद्या मुंबईत बैठक होणार आहे. त्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे.
मी राजीनामा देणार नाही… नायकवाडींची ठाम भूमिका
इद्रिस नायकवाडी यांनी मात्र कुणीही आपला राजीनामा मागितलेला नाही असे स्पष्ट केले आहे. सुनेत्रा पवार यांचे ओएसडी आपल्याला मंत्रालयात अधूनमधून भेटत असतात. पंधरा दिवसांपूर्वी ते कोल्हापूरमध्ये होते तेव्हाही आपल्याला भेटले होते, पण पुठल्याही प्रकारचा राजीनामा देण्याची मागणी पक्षाकडून झाली नसल्याचे नायकवाडी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. अजित पवार यांनी आपल्याला आमदारकीची संधी दिली होती, त्यांनी कधीही आपल्याला मधेच राजीनामा द्यावा लागेल असे सांगितले नव्हते. उलट विधान परिषदेची संधी एकदाच आहे, आता विधानसभेची तयारी करा असे ते म्हणाले होते. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असे नायकवाडी म्हणाले. उद्या आमदारांच्या बैठकीत या चर्चांबाबत आपण निश्चितच मुद्दा मांडू असे त्यांनी सांगितले.



























































