
महाराष्ट्रातील शैवागम परंपरा, शिल्पवैभव आणि त्याअनुषंगाने देवालय संस्कृतीचा सखोल वेध घेणारा, भारतीयविद्या अभ्यासक धनलक्ष्मी महेश टिळे लिखित ‘श्रीमद् आमर्दक औंढा नागनाथः मंदिर स्थापत्य, मूर्तिशास्त्र आणि महाराष्ट्रातील शैवागम परंपरा’ हा ग्रंथ आज प्रकाशित होत आहे. हा ग्रंथ केवळ पारंपरिक मूर्तिशास्त्र सांगणारा नसून, मूर्तीच्या अंतर्गत अनुबंधातून उलगडणारे तत्त्वज्ञान अत्यंत पद्धतशीरपणे मांडणारा महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरेल.
प्रस्तुत संशोधनात राष्ट्रकूट राजा कृष्ण तृतीय याचा कन्हाड ताम्रपटाचे पुनरावलोकन करून, या मंदिराचा निर्मितीकाळ, सांप्रदायिक प्रभाव आणि इतर ऐतिहासिक संदर्भ, दानपत्र हे एका नव्या दृष्टीकोनातून मांडण्यात आले आहेत. प्राचीन काळात ‘आमर्दक मठ’ म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थान ‘सिद्धान्तशैव’ तत्त्वज्ञानाचे प्रमुख केंद्र कसे होते, याचा शोध ऐतिहासिक शिलालेख आणि शैवागम ग्रंथांच्या आधारे घेण्यात आला आहे. इतिहास, पुरातत्त्व आणि भारतीयविद्या या विषयातील अभ्यासक व संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज सायंकाळी सहा वाजता, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. तेजस गर्गे, डॉ. भाग्यलता पाटसकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.































































