
दिल्लीतील मालवीय नगरमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीची घटना ताजी असतानाच आता बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातून घटना समोर आली आहे. मुझफ्फरपूर येथील प्रसाद रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत 20 जण जखमी झाले असून त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
रुग्णालयात आग पसरताच संपूर्ण इमारतीमध्ये प्रचंड प्रमाणात धूर पसरला. यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली.
प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेत 20 हून अधिक रुग्ण जखमी झाले असून, त्यांना इमारतीमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. वाचवण्यात आलेल्या रुग्णांपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना उपचारासाठी तातडीने जवळच्या इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रशासन सध्या त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वैद्यकीय मदतीचे समन्वय साधण्यासाठी सिव्हिल सर्जन स्वतः घटनास्थळी दाखल झाले आहेत.

























































