विधान परिषद निवडणूक; सोलापुरात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी लढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख व भाजपचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात थेट लढत होणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आज निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सोलापुरात तळ ठोकून होते. मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. विधानपरिषदेसाठी 616 उमेदवार आहेत. 18 जून रोजी अंतिम निकाल लागणार आहे.

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यांतील काँग्रेसचे फत्तेपूरकर व राष्ट्रीय समाजवादी पार्टीचे वाघमोडे यांचे अर्ज बाद झाले. आज पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. नागेश अक्कलकोटे, जीवन जानकर, रमेश बारसकर, धनंजय डिकोळे व महेश साठे यांचा समावेश आहे. आता पंढरपूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख व बार्शीचे भाजपचे उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्यात थेट लढत होत आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठsची केली असून, राऊत यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी सोलापुरात तळ ठोकला होता. मात्र, माढय़ाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी राजकीय खेळी करत भाजपाविरुद्ध तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. या निवडणुकीत भाजपकडून डावलले गेलेले पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, शहर उत्तर सोलापूरचे आमदार विजय देशमुख, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ‘या निवडणुकीत सगळ्या अदृश्य शक्तींवर माझे लक्ष आहे. निवडणुकीनंतर योग्य वाट लावू,’ असा इशारा दिला आहे. तर, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ‘काहींच्या इगोमुळे ही निवडणूक लागली,’ असा विरोधकांवर हल्ला केला.