लेखी परीक्षेचा निकालच नाही अन् थेट मुलाखतीच्या तारखा जाहीर, ‘एमपीएससी’चा अजब कारभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) नवा गोंधळ उघड झाला आहे. आयोगाने एका परीक्षेचा निकाल अद्यापही जाहीर केलेला नाही, असे असतानाही मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे या सर्व मुलाखती पाच दिवसांवर आलेल्या आहेत. सर्व मुलाखती मुंबईला होणार आहेत. मात्र पात्र उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. मुलाखतीसाठी कुठल्याही उमेदवारांना ई-मेल किंवा संदेशही पाठवण्यात आलेला नाही.

एमपीएससीच्यावतीने माहिती व जनसंपर्क महासंचालयातील वरिष्ठ सहाय्यक संचालक, वरिष्ठ उपसंपादक पदासाठी मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

उमेदवारांची काय अडचण होणार?

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एमपीएससीने माहिती व जनसंपर्क संचालयालयाच्या विविध पदांसाठी मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला. यातील काही पदांच्या मुलाखतीही झाल्या. मात्र जाहिरात क्रमांक 130मधील वरिष्ठ सहाय्यक संचालक, वरिष्ठ उपसंपादक, जनसंपर्क अधिकारी गट अ या पदांसाठी मुलाखती कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानुसार 16 आणि 17 जूनला उमदेवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. अपात्र उमदेवारांची यादी आयोगाने जाहीर केली आहे. मात्र पात्र उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. उमेदवारांना रेल्वेचे आरक्षण करण्यासह अनेक गोष्टींची तयारी करावी लागते. वेळेवर यादी जाहीर झाल्यास उमदेवारांची तारांबळ उडणार आहे. त्यामुळे आयोगाने तत्काळ मुलाखतीसाठी पात्र उमदेवारांची यादी जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.