
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर फुटीच्या उंबरठय़ावर असलेला ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ममतांपुतसा प्रस्ताव ठेवल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.
बंगालच्या निकालानंतर ममतांची तृणमूल काँग्रेस अडचणीत आहे. बहुतेक आमदार व खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली असून विधानसभा व लोकसभेत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. या सगळ्याचा सामना करण्याचा निर्धार करत नुकताच ममतांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभाग घेतला. त्यानंतर ममतांनी 10 जनपथ येथे जाऊन सोनिया गांधी यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. या बैठकीत सोनियांनी विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवल्याचे समजते. या भेटीत ममता आणि सोनिया यांनी एकमेकाRची गळाभेट घेतली. तृणमूलने हे पह्टो सोशल मीडियात पोस्ट केले. त्यानंतर आज तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस व ममतांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला बळ मिळाले आहे.
राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची ऑफर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनियांनी ममतांना काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद व अभिषेक बॅनर्जी यांना राष्ट्रीय सरचिटणीस पद देऊ केले आहे. विलीनीकरणासाठी ममता तयार आहेत. मात्र त्यांनी निर्णयासाठी वेळ मागितला आहे. त्याचबरोबर राज्यसभेची जागा आणि राज्यसभेत विरोधी पक्षनेते पद दिले जावे, अशी प्रमुख अटही त्यांनी ठेवली आहे. त्याशिवाय अन्य काही मागण्याही त्यांनी केल्या आहेत. काँग्रेसने अद्याप त्यास प्रतिसाद दिलेला नाही.
…तर बंगालमध्ये आघाडी
विलिनीकरण न झाल्यास बंगालमध्ये दोन्ही पक्षांची आघाडी करून निवडणुका लढण्याचाही प्रस्ताव आहे. बदलत्या परिस्थितीत ममतांना काँग्रेसची गरज भासणार आहे. तर, डाव्या पक्षांची जागा भरून काढण्यासाठी काँग्रेसलाही तृणमूलची मदत होऊ शकते.
सयोनी घोष यांचे बंड
निवडणूक प्रचारात भाजपवर आग ओकणाऱया तृणमूलच्या स्टार प्रचारक व ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू सयोनी घोष यांनी देखील बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्या फुटीर गटासोबत जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
शत्रुघ्न सिन्हा यांचेही नाव
तृणमूलच्या फुटीर गटाकडून आज एक यादी जाहीर करण्यात आली. त्यात शत्रुघ्न सिन्हा यांचेही नाव असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपने तिकीट नाकारलेल्या सिन्हा यांना ममतांनी बंगालमधून खासदारकीची संधी दिली होती.





























































