जिनेव्हामध्ये होणार करार, ट्रम्प यांच्यावर युद्ध थांबवण्याची नामुष्की; 6 मुद्द्यांवर सहमती, होर्मुझचा मार्ग जगासाठी होणार मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या चार महिन्यांपासून युद्धय़ाच्या झळा सोसणाऱ्या जगाला अखेर दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युद्ध थांबवण्याची नामुष्की आली आहे. आपण युद्ध थांबवले असून इराणवर होणारे हल्ले थांबवण्याचे आदेश दिल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर आता स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या शहरात अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक शांतता करार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शांतता करारातील सहा मुद्दय़ांवर दोन्ही देशांची सहमती झालेली आहे. त्यामुळे जगाला आर्थिक संकटात टाकणारे इराण युद्ध अखेर थांबले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री इराणवर मोठा हल्ला करणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र नियोजित वेळेच्या तीन तास आधीच त्यांनी हल्ला थांबवला आणि इराण युद्ध संपल्याची घोषणा केली. इराणने शांतता करार मान्य केल्याचेही त्यांनी जाहीर केले, मात्र या घोषणा एकतर्फीच होत्या. अखेर करारातील सहा मुद्दय़ांवर सहमती झाली असून जिनेव्हा येथे एका करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. काही मुद्दय़ांवर जिनेव्हा करार झाल्यानंतर वाटाघाटी होतील. हा करार ‘इस्लामाबाद करार’ म्हणून ओळखला जाणार असून पाकिस्तान यात मध्यस्थ असल्याच्या भूमिकेला यामुळे मान्यता मिळेल. शांतता कराराचा अंतिम मसुदा तयार असल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला आहे. इराणची अब्जावधी डॉलरची मालमत्ता मुक्त करण्यात येईल की नाही, याबाबत स्पष्टता नाही. इराणला कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नाही, असे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी म्हटले आहे. करारावर स्वाक्षरी करण्यासाठी व्हान्स हे जिनेव्हा येथे जाऊ शकतात.

ट्रम्प यांच्यावर युद्ध थांबवण्याचा दबाव

इराणवर हल्ला करण्याचा निर्णय ट्रम्प यांच्याच अंगलट आला आहे. यामुळे अमेरिकेत ट्रम्प यांची लोकप्रियता घटली, शिवाय महागाईदेखील प्रचंड वाढली आहे. युद्धावर पाण्यासारखा पैसा वाया गेला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्यावर देशांतर्गत दबाव वाढला आहे. अखेर युद्ध संपविणे, राजकीय नुकसान होऊ नये आणि अर्थव्यवस्थेला दिलासा मिळेल असा मार्ग ट्रम्प शोधत होते. अखेर मोठा हल्ला करणार असल्याचे जाहीर करून तो वेळेवर थांबवणे आणि युद्ध संपल्याचे जाहीर करणे, ही निती ट्रम्प यांनी वापरल्याचे तज्ञांचे मत आहे.