
पेपरफुटीनंतर 21 जून रोजी होणाऱ्या ‘नीट’ फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता परीक्षेचा कालावधी 180 मिनिटांऐवजी 195 मिनिटांचा असेल. परीक्षेसाठी दुपारी 2 ते सव्वा पाचपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. तसेच प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला आणि शेवटी मिळून रफ कामांसाठी पानांची संख्या 2 वरून थेट 4 करण्यात आली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट’ (नीट युजी- 2026 ) प्रवेश परीक्षा यंदा 21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
प्रश्नपत्रिका सोडवायला पूर्ण वेळ
हजेरीपटावर स्वाक्षऱ्या करणे, ओळख पटवणे आणि इतर पर्यवेक्षकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल आणि प्रशासकीय कामांमुळे वेळ कमी पडल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होणार नाही.



























































