
अमेरिकेचं नाव घेतलं की डोळ्यासमोर गगनचुंबी इमारती, प्रगत तंत्रज्ञान, हायटेक शहरे उभी राहतात. मात्र याच अमेरिकेत असं गाव आहे जिथे ना टीव्ही, ना स्मार्टफोन, ना वीज आहे तरीही इथले लोक आनंदी जीवन जगत आहेत. एआयच्या युगात 300 वर्षांपूर्वीच्या परंपरेने जगणारे हे गाव पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. लाखो पर्यटक येथील अनोखी जीवनशैली अनुभवण्यासाठी भेट देतात.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, हे ठिकाण आहे पेनसिल्व्हेनियामधील लँकेस्टर काउंटीमधील ‘अमिश कंट्री’. अमिश समुदाय आजही आधुनिक सोयीसुविधा टाळून साधे जीवन जगतो. बहुतेक अमिश कुटुंबांकडे घरात टीव्ही, स्मार्टफोन नाही किंवा सोशल मीडिया वापरत नाहीत. अनेकांकडे तर विजेचे कनेक्शनसुद्धा नाही.
आधुनिक तंत्रज्ञान लोकांना कुटुंब आणि समाजापासून दूर करते, असा त्यांचा समज आहे. त्यामुळे ते केवळ जी कुटुंब आणि समाजाला मजबूत करतील, लोकांमध्ये अंतर निर्माण होणार नाही अशाच साधनांचा अवलंब करतात.
अमिश प्रदेशातील रस्त्यांवर आजही घोडागाड्या दिसतात. पुरुष लांब दाढी आणि साधे कपडे घालतात, तर स्त्रिया लांब स्कर्ट आणि बोनेट घालतात. ‘अमिश अमेरिका’ या वेबसाइटनुसार, अनेक कुटुंबे आजही ट्रॅक्टरऐवजी शेती करण्यासाठी घोड्यांचा वापर करतात. जेवण लाकडी चुलीवर शिजवले जाते आणि रात्री अनेक घरांमध्ये प्रकाशासाठी गॅसचे दिवे किंवा मर्यादित बॅटरी वापरल्या जातात.



























































