
कोपरा येथील सेक्टर १० मधील स्मशानभूमीच्या पाण्याच्या टाकीत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह गेल्या महिनाभरापासून टाकीत पडून होता. या कालावधीत अंत्यविधीसाठी येणारे नागरिक याच दूषित पाण्याचा वापर करत होते. या हलगर्जीपणाचा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल महापालिका प्रशसनाला जाब विचारण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
कोपरा गावातील स्मशानभूमीचा वापर प्रामुख्याने स्थानिक ग्रामस्थांकडून केला जातो. गुरुवारी गावातील संतोष तांबोळी यांच्या २७ वर्षीय पुतण्याचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू झाला होता. या तरुणाचा अंत्यविधी करण्यासाठी तांबोळी यांच्यासह अनेक नातेवाईक स्मशानभूमीत गेले असता परिसरात उग्र दुर्गंधी येत होती. मात्र त्याकडे विशेष लक्ष देण्यात आले नाही.
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी होम व पुढील विधीसाठी पुन्हा स्मशानभूमीत तांबोळी यांचे नातेवाईक गेल्यावर त्यांना पाण्यातून दुर्गंधी अधिक तीव्र येऊ लागल्याने ग्रामस्थांनी परिसराची पाहणी केली. त्यांनी पाण्याच्या टाकीत डोकावून पाहिल्यानंतर त्यांना कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. दरम्यान या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पनवेल पालिकेतील शिवसेनेच्या गटनेत्या लीना गरड यांनी केली आहे.



























































