
वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळंबी येथील आश्रमशाळेमागील जंगल परिसरातील तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू पुंजाराम कोडापे (वय ३०, रा. कोळंबी) हा आपल्या चुलत भावासह गावातील अन्य युवकांसोबत तलाव परिसरात पार्टी करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने मद्यप्राशन केले होते.
पार्टीदरम्यान राजू कोडापे हा तलावात पोहण्यासाठी उतरला. मात्र, मद्याच्या नशेत असल्याने त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात गेला. काही वेळानंतर तो दिसेनासा झाल्याने सोबतच्या युवकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
दरम्यान दुसऱ्या दिवशी राजू कोडापे याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मृताचा चुलत भाऊ किशोर अर्जुन कोडापे (वय २२) यांच्या जबानीवरून वडगाव जंगल पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद (मर्ग) केली असून पुढील तपास सुरू आहे.




























































