पंजाबचे मुख्यमंत्री मान यांच्याविरोधात ‘गुरू द्रोहा’चा ठपका; अकाल तख्तने दिला निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकाल तख्त येथील शिख धर्मगुरूंनी सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना ‘गुरू द्रोही’ (गुरूंचे विरोधी) आणि ‘खालसा पंथ विरोधी’ असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिखांच्या भावना दुखावणारे एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप खोटे असल्याचा दावाच खोटा असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

अकाल तख्त हे शिखांचे सर्वोच्च धार्मिक आणि सर्वोच्च पीठ आहे. शिख धर्मगुरूंनी पक्षाचा विचार न करता राज्यातील सर्व शिख आमदार आणि पंजाबच्या मंत्रिमंडळाला एका धर्मनिंदा विरोधी कायद्याच्या संदर्भात २९ जून रोजी अकाल तख्तसमोर हजर राहण्याचे समन्स जारी केले आहेत.

अमृतसरमध्ये ‘पाच सिंह साहिबान’ (शिख धर्मगुरू) यांच्यात बैठक झाल्यानंतर अकाल तख्तचे जथेदार ग्यानी कुलदीप सिंह गरगज्ज यांनी ‘फसील’वरून (अकाल तख्तच्या व्यासपीठावरून) हा आदेश सुनावला.

‘जागत जोत श्री गुरू ग्रंथ साहिब सत्कार (सुधारणा) कायदा, २०२६’ या धर्मनिंदा विरोधी कायद्यासह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विविध शिख संघटनांसोबत बोलावलेल्या बैठकीनंतर हा आदेश देण्यात आला आहे.

या बैठकी दरम्यान, मान यांच्या विरोधात ४ जानेवारी रोजी तक्रारीचा भाग म्हणून सादर करण्यात आलेल्या एका ‘आक्षेपार्ह व्हिडिओ’ बद्दल गंभीर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, अकाल तख्तच्या ‘सिंह साहिबान’ यांनी ही घोषणा करण्याच्या काही वेळ आधी, आम आदमी पक्षाचे पंजाब मीडिया प्रभारी बलतेज सिंह पन्नू यांनी सोमवारी सांगितले की, अकाल तख्त जथेदार दावा करत असलेल्या लॅब रिपोर्टमध्ये व्हिडिओतील व्यक्ती नक्की कोण आहे हे स्पष्ट झालेले नाही.