
इस्रायलच्या लष्कराने गुरुवारी रात्री दक्षिण लेबनॉनमध्ये अनेक ठिकाणी भीषण हवाई हल्ले केले. या हल्ल्यात आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायली लष्कराने हे हल्ले अजूनही सुरूच असल्याचे सांगितले आहे. या हल्ल्यांमुळे इराण आणि अमेरिकेत युद्ध संपवण्यासाठी झालेल्या प्राथमिक कराराला धोका निर्माण झाला आहे.
लेबनॉनच्या अधिकृत ‘नॅशनल न्यूज एजन्सी’ने दिलेल्या वृत्तानुसार, लेबनॉनमधील या सततच्या युद्धामुळे नुकताच स्वाक्षरी झालेला नवीन करार मोडीत निघू शकतो. या करारामध्ये ‘लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर’ तात्काळ लष्करी कारवाया थांबवण्याचे आणि लेबनॉनची ‘प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व’ सुनिश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इस्रायल या भागात इराण-समर्थित हिजबुल्लाह या बंडखोर संघटनेविरुद्ध युद्ध लढत आहे.
याच वर्षी निवडणुकांना सामोरे जाणारे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मात्र सैन्य मागे घेण्यास नकार दिला आहे. हिजबुल्लाहचा धोका पूर्णपणे संपुष्टात येत नाही, तोपर्यंत इस्रायली सैन्य लेबनॉनमध्येच राहील, असे नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे.
लेबनॉनमधील हे हल्ले अशा वेळी झाले आहेत, जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध कायमचे संपवण्यासाठी चर्चा सुरू होती. मात्र या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा पुढे ढकलण्यात आली आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स (JD Vance) यांनी गुरुवारी आपला स्वित्झर्लंडचा दौरा पुढे ढकलला, जिथे ते या चर्चेचे नेतृत्व करणार होते. व्हाईट हाऊसने याचे कारण तांत्रिक आणि व्यवस्थापकीय (Logistical) अडचणी असल्याचे सांगितले.
मात्र, हिजबुल्लाहशी राजकीयदृष्ट्या जोडलेल्या ‘अल-मायादीन’ या वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, लेबनॉनमध्ये इस्रायलकडून सुरू असलेल्या लष्करी कारवाईमुळे इराणने आपले शिष्टमंडळ स्वित्झर्लंडला पाठवण्यास उशीर केला आहे.




























































