
राजापूर तालुक्यातील परटवली येथून करक-कारवली रिंग रोडमार्गे अनुस्कुरा तपासणी नाका चुकवत कोल्हापूरच्या दिशेने पाच बैलांची वाहतूक करणारा एमएच-०९-जीजे-५२८२ क्रमांकाचा टेम्पो ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पहाटे पकडण्यात आला. पाचल व परिसरातील तरुणांनी सुमारे पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास टेम्पोचा पाठलाग करून तो अडवला आणि रायपाटण पोलीस दूरक्षेत्राच्या ताब्यात दिला. सदर घटना पहाटे ३ च्या दरम्यान घडली असून पोलिसांना सकाळी ५ वाजता कळवण्यात आल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोच्या पुढे एका चारचाकी वाहनातून कथित एजंट तबरेज ठाकूर हा मार्गदर्शन करत असल्याचा आरोप आहे. मात्र, पाठलागादरम्यान तो चारचाकीसह पसार झाला. तबरेज ठाकूर याचा शोध चालू असून त्याच्या चार साथीदारांची चौकशी चालू आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून, अलीकडच्या काळात त्याने अनेक वेळा गुरांची तस्करी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
टेम्पोमध्ये बैलांना अत्यंत अमानुष पद्धतीने बांधण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आणखी काही काळ त्याच अवस्थेत राहिले असते तर गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असता, असा दावा स्थानिकांनी केला.पहाटेच्या वेळी करक-कारवली रिंग रोडवर वाहतूक कमी असल्याने संशयास्पद वाहनाचा आवाज ग्रामस्थांच्या कानावर पडला. त्यानंतर एकमेकांना संपर्क करून परिसरातील तरुणांनी एकत्रितपणे टेम्पोचा पाठलाग केला आणि तो पकडण्यात यश मिळवले. मात्र, पुढे असलेल्या चारचाकी वाहनातील संशयित एजंट पसार झाला.
या प्रकरणी रायपाटण पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख व त्यांच्या पथकाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.



























































