
वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी चार फाटा ते तेलीपाडा तसेच जेएनपीए ते फुंडे हायस्कूल या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सिडकोने १४ कोटी ५० लाखांच्या निधीला मंजुरी दिली आहे. दिवाळीपर्यंत या दोन्ही रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे ट्रॅफिकच्या कटकटीतून वाहनचालकांसह प्रवाशांची सुटका होणार आहे.
उरण ओएनजीसी, चारफाटा, एसटी स्टँड, करंजा रस्त्याला जोडणारा चार फाटा ते तेलीपाडा हा जुना ७ मीटर रुंदीचा रस्ता आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे या रस्त्यावर वाहतूककोंडी नित्याचीच बाब झाली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी सिडकोने चार फाटा ते तेलीपाडा हा जुना ७ मीटर रुंदीचा रस्ता २० मीटरपर्यंत रुंद करण्यात येणार आहे. यासाठी १३ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जेएनपीए कामगार वसाहत ते बोकडविरा फ्लायओव्हरदरम्यान जुना रस्ता वाढत्या रहदारी व वाहतुकीसाठी अगदी अरुंद आहे. त्यामुळे या रस्त्यावरही वाहतूककोंडीची समस्या असून सुमारे ५ किमी लांबीच्या रस्त्याचेही रुंदीकरण केले जाणार आहे. या कामासाठी दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
खारफुटीचा अडथळा.. वनविभागाकडे पाठपुरावा
फुंडे हायस्कूल ते बोकडविरा फ्लायओव्हरदरम्यान रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर खारफुटी आहे. यासाठी वनखात्याच्या अखत्यारितीतील परवानगीसाठी पाठपुरावा, पत्रव्यवहार सुरू आहे. खारफुटी नसलेल्या जेएनपीए ते फुंडे हायस्कूलदरम्यानचा ५०० मीटर रस्त्याच्या कामाला सिडकोने मंजुरी दिली आहे. तूर्तास वनविभागाच्या विविध परवानग्या मिळेपर्यंत ५०० मीटर लांबीचा रस्ता २० मीटर रुंद करण्यात येणार आहे. यासाठी १.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून मंजुरीनंतर निविदाही मागवण्यात आल्या आहेत, अशी माहिती सिडकोच्या द्रोणागिरी नोड-२ विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव कोलाप यांनी दिली.

























































