लक्ष्मी ऑर्गेनिकमधील प्रदूषणासंदर्भात बैठक घेणार, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वी काही वैयक्तिक कामानिमित्त कोकणचा दौरा केला तेव्हा लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांनी माझी भेट घेऊन निवेदन दिले आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्या ना फोन करून लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या विरोधातील तक्रारींच्या संदर्भात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिले.

चंद्रपूरमधील औष्णिक वीज, कोळसा खाणी व इतर औद्योगिक प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाच्या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीवरील चर्चेत भाग घेताना शिवसेनेचे विधानसभेतील गट नेते भास्कर जाधव यांनी कोकणातील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. भास्कर जाधव म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील केमिकल झोनला पंकजा मुंडे यांनी भेट दिली. तेव्हा जर आपली भेट झाली असती तर माझ्या समस्या तेव्हाच सुटल्या असत्या. आमच्या मतदारसंघात लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनी सुरू झालेली आहे. या कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात ग्रामस्थ 190 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या कंपनीच्या प्रदूषणाच्या विरोधात ग्रामस्थांनी तुम्हालाही निवेदन दिले आहे. यामध्ये आपण लक्ष टाकणार आहात का?

तुम्ही ज्या भागाला भेट दिली त्या भागात फक्त केमिकल झोन असल्यामुळे रासायनिक कारखान्यांचे प्रचंड प्रदूषण झालेले आहे. चंद्रपूरमधील प्रदूषणावर ज्या प्रकारे तुम्ही नियंत्रण आणत आहात त्याच पद्धतीने येथे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी भास्कर जाधव यांनी केली.

यावर उत्तर देताना पर्यावरण व वातावरणीय बदलमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, काही वैयक्तिक कामानिमित्त कोकणचा दौरा केला तेव्हा लक्ष्मी ऑर्गेनिकच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांनी माझी भेट घेऊन निवेदन दिले. तेव्हा जिल्हाधिकाऱ्या शी मी तात्काळ बोलले आहे. त्यांना आदेश दिले आहेत. जे आमच्या डोळ्याला आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रदूषण दिसेल त्याच्याविरोधात नक्कीच कारवाई करू. लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या विरोधातील तक्रारींच्या संदर्भात स्वतंत्र बैठक घेऊ, असे आश्वासन यावेळी पंकजा मुंडे यांनी दिले.