
धावत्या लोकल ट्रेनमधील तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच माहीम रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या चाकूहल्ल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. लागोपाठ घडलेल्या दोन घटनांनी गुन्हेगारांमध्ये कायद्याचे भय उरले नसल्याचेच स्पष्ट होत आहे. माहीमच्या घटनेतील हल्लेखोर तरुणाला माहीम पोलिसांनी तीन दिवसांनंतर रविवारी अटक केली. धक्का लागून हातातील मोबाईल खाली पडल्याच्या किरकोळ कारणावरून चाकूहल्ला केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
हल्लेखोराचे नाव अनस खान असे असून त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले होते.
न्यायालयाने अनसची पोलीस कोठडीत रवानगी केली. तक्रारदार नवीन प्रसन्ना हे माहीम येथे राहतात. २५ जूनला रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते कार्यालय सुटल्यानंतर लोअर परेल येथून धिम्या लोकलने माहीम रेल्वे स्थानकात आले होते. स्थानकाच्या विरुद्ध बाजूला आले. यादरम्यान त्यांचा धक्का अनसला धक्का लागला आणि अनसच्या हातातील मोबाईल खाली पडला. त्यावर नवीन यांनी अनसची माफी मागितली. परंतु अनस ऐकून घेण्याच्या मानसिकेतच नव्हता. त्याने नवीन यांच्याशी वाद घातला.
मोबाईलचे नुकसान भरून न दिल्यास जिवंत सोडणार नाही, अशी थेट धमकीच अनसने दिली. पुढे काही समजण्यापूर्वीच त्याने नवीन यांच्या पोटात चाकू मारला. चाकूहल्ला केल्यानंतर अनस तेथून पळून गेला होता. गजबजलेल्या माहीम रेल्वे स्थानकाच्या आवारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. लोकलमध्ये तरुणावर चाकूने वार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेपुढे गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या नवीन यांना कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले होते. घटनेची माहिती समजताच माहीम पोलिसांनी रुग्णालय गाठले आणि अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोर अनसला तीन दिवसांनंतर रविवारी अटक केली.


























































