
अंधेरी (पूर्व) येथील कामगार विमा रुग्णालयाची (ईएसआयसी) दुरुस्ती व नूतनीकरणाचे उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल अशी माहितीही बोर्डीकर यांनी दिली.
अंधेरीतील कामगार रुग्णालयासंदर्भातील लक्षवेधी सूचना आमदार मुरजी पटेल यांनी मांडली होती. त्यावरील चर्चेत भाग घेताना महेश सावंत यांनी धर्मादाय रुग्णालयांच्या फसवेगिरीबाबत सभागृहाला अवगत केले. लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी धर्मादाय रुग्णालयांची अचानक पाहणी केली जाईल असे आश्वासन दिले.
अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या खासगीकरणाबाबतही आमदारांनी यावेळी सरकारला विचारणा केली. मुंबईतील करदात्यांच्या पैशांनी सेव्हन हिल्स रुग्णालय उभारले गेले आहे, त्यामुळे ते मुंबईकरांसाठीच चालवले गेले पाहिजे, असे काँग्रेस आमदार अस्लम शेख म्हणाले. सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या संदर्भातील समस्या जाणून घेण्यास आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.
गरीब रुग्णांची दिशाभूल करणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांवर अचानक धाडी घाला – महेश सावंत
मुंबईतील धर्मादाय रुग्णालयांमध्ये किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती दिली जात नाही. विचारणा केल्यास बेड उपलब्ध नाहीत असे उत्तर दिले जाते. उपलब्ध बेडची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देश धर्मादाय रुग्णालयांना द्यावेत आणि त्याचे पालन होतेय की नाही याची खात्री करण्यासाठी अचानक धाडी घालाव्यात, अशी मागणी शिवसेना आमदार महेश सावंत यांनी आज विधानसभेत केली.


























































