
मोहने येथील एनआरसी कंपनीच्या थकीत देयकांच्या वसुलीकडे कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून वारंवार टाळाटाळ करत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी आज सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच पळापळ उडाली. दरम्यान एनआरसी कंपनीच्या थकबाकी प्रकरणाची सविस्तर माहिती दोन महिन्यांच्या आत सभागृहासमोर सादर करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत झाले.
शिवसेना नगरसेवक राहुल कोट यांनी मोहने येथील एनआरसी कंपनीकडे महापालिकेची मोठी थकबाकी असतानाही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस वसुली किंवा कारवाई केलेली नसल्याचा मुद्दा आज महासभेत उपस्थित केला. प्रत्येक महासभेत याबाबत माहिती विचारल्यानंतर प्रशासनाकडून पुढील महासभेत माहिती देऊ असे सांगून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली. प्रत्यक्षात समितीत केवळ अधिकाऱ्यांचाच समावेश करण्यात आल्याने राहुल कोट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. समितीत सदस्यांना स्थान का देण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित करत कोट यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरू केले. उमेश बोरगावकर, संकेश भोईर, अपर्णा भोईर आणि स्वप्नाली केणे यांनीही प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाल्यानंतर अखेर महापौर, उपमहापौर आणि सभागृहातील वरिष्ठ सदस्यांनी हस्तक्षेप केला. मात्र शिवसेना नगरसेवक आपल्या मागणीवर ठाम असल्यामुळे प्रशासनाला आपली भूमिका मांडावी लागली. त्यानंतर नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले.


























































