
>> श्रीरंग काटेकर
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वैद्यकीय क्षेत्रात पारंपरिक पद्धतीने होणारी शस्त्रक्रिया आता कालबाह्य होत आहेत. एआय तंत्रज्ञान वापरून होणारी रोबोटिक सर्जरी अधिक अचूक व परिणामकारक असल्यामुळे रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. आज जागतिक डॉक्टर दिन. त्यानिमित्त या नवीन पर्वाचा घेतलेला मागोवा.
मानवी शरीरावरील शस्त्रक्रियांचा इतिहास खूप जुना मानला जात असला तरी शस्त्रक्रिया म्हटले की, लोकांना धडकी भरते. शरीराची अत्यंत कुशलतेने चिरफाड करून आजाराचे कारण असलेल्या घातक घटकाला शरीराबाहेर काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. मानवी शरीरातील दुर्धर आजार हा जेव्हा औषधोपचारांना साथ देत नाही त्यावेळी शस्त्रक्रियेशिवाय डॉक्टरांपुढे पर्याय उरत नाही. मात्र अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात घडत असलेल्या या नवक्रांतीमुळे प्रक्रिया अधिक सुलभ व कमी वेदनादायी होत आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.
आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून होऊ लागलेली रोबोटिक सर्जरी अचूक व परिणामकारक ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. अनेक कठीण व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानाच्या आधारे यशस्वी झाल्या आहेत. विशेषतः कर्करोग, यकृत तसेच मेंदूसंदर्भातील दुर्धर आजारांच्या बाबतीत त्याचा जास्त उपयोग होत आहे. यामध्ये कर्करोग, मेंदूतील गाठी अगदी अलगदपणे रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून काढता येणे शक्य झाले आहे. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अनेकदा रुग्णांसाठी जीवघेण्या ठरतात. काळाच्या ओघात आता वैद्यकीय सेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल झाल्याने शरीरातील कोणत्याही अवयवांमधील शस्त्रक्रिया सहजपणे करता येणे शक्य झाले आहे.
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वैद्यकीय क्षेत्र हे आता हायटेक बनले आहे. रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शस्त्रक्रिया करण्याकडे रुग्ण व डॉक्टरांचा कल वाढला आहे. अचूकपणे शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी ही कार्यप्रणाली उपयुक्त ठरत आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना कमी वेदना व कमी रक्तस्राव होत असल्याने रोबोटिक शस्त्रक्रियेला रुग्णांची अधिक पसंती मिळत आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेदरम्यान संसर्गाचा धोका हा कमी जाणवतो. तसेच रुग्णालयात कमी कालावधीचा मुक्काम, पैशांची बचत हे रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे आहेत. शस्त्रक्रिया तंत्रात आधुनिकीकरण होत असल्याने यापुढील काळातही रुग्णांना अधिक जलद गतीने सेवा देणे शक्य होणार आहे असे तज्ञ डॉक्टरांचे मत आहे. रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रक्रियेची मागणी आता सर्वच स्तरांवर जोर धरू लागली आहे. शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातील रुग्ण रोबोटिक शस्त्रक्रियेला प्राधान्य देत आहेत. सातारा शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये या तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रक्रिया करण्याचा कल वाढत असून अनेक रुग्णालयांनी याबाबत सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. लॅप्रोस्कोपीद्वारे होणारी शस्त्रक्रिया सातारा जिल्ह्यातील अनेक नामवंत हॉस्पिटलमध्ये केली जाते. हा रोबोटिक शस्त्रक्रियेपूर्वीचा पहिला टप्पा मानला जातो. रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रक्रियेचे नवे पर्व आता सुरू झाल्याने अनेक जटिल व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आता सुलभ पद्धतीने यशस्वी करता येणे शक्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन तज्ञ डॉक्टरांच्या साह्याने होणारी ही शस्त्रक्रिया अचूकपणे व रुग्णांना कमी वेदना देणारी ठरत असल्याने रुग्णांमधील भीतीचे प्रमाण कमी झाले आहे. आपल्या देशातही या तंत्रज्ञानाचा आधारे यशस्वीपणे शस्त्रक्रिया होत असल्याने नजीकच्या काळात रोबोटिक शस्त्रक्रिया ही रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे.





























































