
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालय परिसरात सणासुदीच्या काळात लावण्यात येणाऱ्या तात्पुरत्या व्यावसायिक स्टॉल्सवर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध केला होता. शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश आले असून सत्ताधाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत ठराव मागे घेतला आहे.
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे लघु व्यावसायिक, महिला बचत गट आणि गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे गटाचे नगरसेवक प्रतीक पेणकर यांनी सणासुदीच्या काळात उभारल्या जाणाऱ्या तात्पुरत्या स्टॉल्सवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्याची तयारी दर्शवल्यानंतर विविध स्तरांतून
नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या प्रस्तावामुळे होळी, दिवाळी, मकरसंक्रांत, रक्षाबंधन तसेच इतर सणांमध्ये व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेकडो कुटुंबांच्या रोजगारावर गदा येणार होती.
ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांनी या प्रस्तावाला विरोध करून तसे निवेदन पालिका आयुक्तांना दिले. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते उमेश बोरगावकर, शहराध्यक्ष बाळा परब यांच्या सहकार्याने या प्रस्तावाविरोधात ठाम भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेतला. संत रोहिदास ज्ञाती समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच या व्यवसायाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक विक्रेत्यांनी शिवसेनेचे आभार मानले.
गरजूंना आर्थिक आधार
दरवर्षी पालिकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या या स्टॉल्सच्या माध्यमातून अनेक महिला, बचत गट आणि लघु व्यावसायिकांना आर्थिक आधार मिळतो. या व्यवसायातून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असून पालिकेलाही महसूल प्राप्त होतो. त्यामुळे या उपक्रमावर बंदी घालण्याचा प्रस्ताव सर्वसामान्यांच्या हिताला बाधा पोहोचवणारा होता.




























































