
एक क्षण असा आला होता की, इंग्लंडचा विश्वचषक प्रवास बाद फेरीच्या पहिल्याच सामन्यात संपणार की काय, अशी भीती चाहत्यांच्या मनात निर्माण झाली होती. मात्र, संकटमोचक कर्णधार हॅरी केन याने पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची आणि गोल करण्याच्या विलक्षण क्षमतेची प्रचीती देत दोन उशिरा केलेल्या गोलांच्या बळावर इंग्लंडने डेमोव्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोवर 2-1 अशी थरारक मात केली. या विजयासह संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत (अंतिम 16) धडक मारली असून आता रविवारी सहयजमान मेक्सिकोचे त्यांना कडवे आव्हान असेल.
सातव्या मिनिटालाच कांगोने केला गोल…
संपूर्ण स्टेडियम इंग्लंडच्या लाल-पांढऱया रंगात न्हाऊन निघाले असतानाच कांगोने सामन्याच्या सुरुवातीलाच इंग्लंडला जबर धक्का दिला. ब्रायन सिपेंगा याने सातव्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे इंग्लंड 0-1 अशा पिछाडीवर पडला. गोलरक्षक जॉर्डन पिकफर्ड याच्याकडून झालेल्या चुकीचा काँगोने अचूक फायदा उचलला आणि इंग्लंडच्या छावणीत खळबळ उडाली.
…अन् इंग्लंडचा जीव भांडय़ात पडला
विश्वचषकातील 60 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या इंग्लंडला या धक्क्यानंतर सावरायलाही वेळ लागला. ज्यूड बेलिंगहॅम, मार्कस रॅशफर्ड आणि हॅरी केन यांनी एकामागून एक हल्ले चढवले, पण कांगोचा गोलरक्षक लायोनेल म्पासी अक्षरशः अभेद्य भिंत बनून उभा राहिला. बेलिंगहॅमचे दमदार हेडर, रॅशफर्डचा जोरदार फटका आणि केनच्या संधी त्याने अफलातून बचाव करत परतवून लावल्या. इतकेच नव्हे तर मध्यंतरापूर्वी योआने विस्सा याला कांगोची आघाडी दुप्पट करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती, मात्र त्याचा फटका थेट पोस्टला लागल्याने इंग्लंडचा जीव भांडय़ात पडला.
केनचा 13 वा वर्ल्ड कप गोल
या दोन गोलांसह हॅरी केनने विश्वचषकातील गोलांची संख्या 13 वर नेली, तर यंदाच्या स्पर्धेत त्याच्या खात्यात आता 5 गोल जमा झाले असून ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत त्याने आपला दावा अधिक मजबूत केला आहे. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हा त्याचा 84 वा गोल ठरला.
हॅरी केनचा निर्णायक गोल
दुसऱया सत्रात इंग्लंडचा खेळ निष्प्रभ होत चालला असताना प्रशिक्षक थॉमस टुखेल यांनी बुकायो साका, अँथनी गॉर्डन आणि एबेरेची एझे यांना मैदानात उतरवून डाव बदलला. या निर्णयाचे सोनं करत अँथनी गॉर्डन याने 75 व्या मिनिटाला अप्रतिम क्रॉस टाकला आणि हॅरी केन याने अचूक हेडर करत इंग्लंडला बरोबरी मिळवून दिली. सामना अतिरिक्त वेळेकडे झुकत असतानाच 86 व्या मिनिटाला पुन्हा गॉर्डननेच केनला चेंडू पुरवला. यावेळी केनने कोणतीही चूक न करता जोरदार फटका मारत चेंडू थेट जाळ्याच्या छतावर आदळवला आणि इंग्लंडला 2-1 अशी नाटय़मय आघाडी मिळवून दिली. अखेर हीच आघाडी निर्णायक ठरली.




























































