
मुंबई महानगरपालिकेतील सर्व सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क योजना तातडीने लागू करण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 24 फेब्रुवारी 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका तसेच विविध स्वायत्त संस्थांमधील शौचालय, मननिस्सारण व्यवस्था, ड्रेनेज, नाली-गटार, रुग्णालयांची स्वच्छता, शवविच्छेदन गृह आणि साफसफाईची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘सफाई कामगार’ म्हणून परिभाषित करण्यात आले आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने मुंबई पालिकेतील मलनिस्सारण, बाजार, स्मशानभूमी, आरोग्य विभाग कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘सफाई कामगार’ घोषित करून त्यांना लाड समितीच्या वारसा हक्काच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने आयुक्तांकडे सातत्याने केली असल्याचे जामसुतकर यांनी निदर्शनास आणून दिले.


























































