
मुसळधार पावसाचे धुमशान सुरूच असून घोडबंदर रोडवर सलग दुसऱ्या दिवशी तुफान कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहून आलेले पाणी महामार्गावर साचल्याने ठाण्याहून फाऊंटन हॉटेलकडे जाणारा एक मार्ग अजूनही वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने सर्व वाहतूक करण्यात आली. हजारो प्रवाशांना दीड ते दोन तासांचा खोळंबा करत द्राविडी प्राणायाम करावा लागला.
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरभागातून वाहून आलेले पाणी करपे कंपाऊंड परिसरात रस्त्यावर साचले. त्यामुळे ठाण्याहून फाऊंटन हॉटेलकडे जाणारा मार्ग जलमय झाला. सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग तात्पुरता बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.
घोडबंदरवर तुफान कोंडी सर्व वाहने एकाच मार्गावर आल्याने गायमुख घाटासह संपूर्ण घोडबंदर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. गुरुवारी सकाळपासूनच कामावर जाणारे नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी यांना फटका बसला. खासगी बस, रिक्षा तसेच अन्य प्रवाशांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. अनेकांना नियोजित वेळेपेक्षा दीड ते दोन तास कामावर जाण्यासाठी उशीर झाला.
अतिरिक्त पोलीस तैनात
वाहतूक सुरळीत करण्यासाठी काशिमीरा वाहतूक शाखेकडून अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली. दरम्यान पुढील दोन दिवस या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, अत्यावश्यक कामाशिवाय ठाणे-घोडबंदर मार्गावरील प्रवास टाळावा आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन ठाणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना केले आहे.





























































