
सत्तेच्या धुंदीत असलेल्या मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांना आता पोलिसांचेही भय राहिलेले नाही. जमिनीच्या वादातून मिंधे गटाचा जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे याने पिस्तुलातून गोळीबार करत दहशत माजवल्याचा प्रकार सूस-नांदे रोडवरील एका बांधकाम साइटवर घडला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बावधन पोलिसांनी चांदेरे याच्यासह त्याच्या साथीदाराला गजाआड केले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
मिंधे गटाचा जिल्हाप्रमुख बाळासाहेब रामदास चांदेरे (वय ५४, रा. सूसगाव) आणि संदेश सतीश माने (वय ३७, रा. कात्रज-कोंढवा रोड, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत बांधकाम साइटवरील सुरक्षारक्षक नागेश मोहन राठोड (वय २१, रा. नन्हे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बावधनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित साइट बांधकाम व्यावसायिक लहूराज माळी यांची आहे. या साइटच्या जागेवरून चांदेरे आणि माळी यांच्यात वाद आहे. या वादातूनच गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास चांदेरे आणि आरोपी माने साइटवर आले. त्यांनी फिर्यादी नागेश आणि त्याच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यातून हाणामारी झाली. यावेळी चांदेरे याने कमरेचे पिस्तूल काढले, त्यामुळे नागेश आणि त्याचे सहकाऱ्यांनी पळ काढला. त्यावेळी त्यांच्या दिशेने चांदेरेने एक गोळी झाडली.
घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी मारहाण, शिवीगाळ, धमकी, लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणे, शस्त्र कायद्याचे उल्लंघन, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी ठाकूर तपास करत आहेत.



























































