
मुसळधार पाऊस बरसल्याने भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. धरणातून 3706.98 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला. या भागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कारधा नदीची पातळी सध्या इशारा पातळीखाली असली तरी यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पुजारीटोला धरणात 80.01 टक्के पाणीसाठा असून चार दरवाजे उघडण्यात आले आहेत.
कोल्हापुरातील घटप्रभा तुडुंब
कोल्हापूर जिह्यात पावसाने दमदार सुरुवात केल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. जुलैच्या पहिल्याच आठवडय़ात चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण 100 टक्के भरले असून शनिवारी मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाले आहे. जिह्यातील पहिलेच धरण भरून वाहू लागल्याने चंदगडमधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणातून 450 क्युसेक विद्युत विसर्ग करण्यात आला.
हतनूरचे 22 दरवाजे उघडले
जिह्यातील भुसावळमधील हतनूर धरणात पावसाच्या संततधारेमुळे धरणाचे 41 पैकी 22 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले. हतनूर धरणातील पाण्याची पातळी 212 मीटरवर पोहोचली आहे. एकूण जलसाठा 289.00 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 74.48 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शनिवारी सकाळी 10 वाजता धरणाचे 22 दरवाजे एक मीटरने उघडले.































































