
‘एमपीएससी’ परीक्षेतील आणखी एक गैरप्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक पदाचा ‘मार्किंग पॅटर्न’ (गुणांकन पद्धत) परीक्षेआधीच फुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाच्या सह आयुक्तांसह काही अधिकारी दोषी असल्याचे पोलिसांच्या चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानंतरही आयोगाकडून संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षकांच्या 137 पदांसाठी ‘एमपीएससी’कडून विभागीय परीक्षा घेण्यात आली होती, मात्र या परीक्षेपूर्वीच गुणांकनाची पद्धत उघड झाल्याने संपूर्ण परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, काही उमेदवारांना अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाल्याची तक्रार काही परीक्षार्थी उमेदवारांनी केली आहे. चौकशीसाठी हे प्रकरण नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीत उत्पादन शुल्क विभागातील सह आयुक्तांसह काही अधिकारी दोषी आढळल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या चौकशीच्या आधारे संबंधितांवर कारवाई करण्यासाठी अहवाल आयोगाकडे पाठवण्यात आल्याचे नागपूर पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले.




























































