
तुफानी पावसामुळे शहरात एकापाठोपाठ एक कोसळणाऱ्या वृक्षांची दहशत पसरली असून तब्बल ३ हजार झाडांची छाटणी लटकली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पावसाच्या माऱ्याने वृक्ष कोसळून ४ जण गंभीर जखमी तर वाहनांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील झाडांच्या फांद्या वेळेत न छाटल्यामुळे हा धोका निर्माण झाला असून पालिकेचा कानाडोळा ठाणेकर नागरिकांच्या जीवावर बेतला आहे. ज्या ठेकेदाराला हे छाटणीचे काम देण्यात आले त्या ठेकेदाराकडून छाटणीचे काम वेळेत का झाले नाही, आता भरपावसात फांद्या कशा छाटणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
यावर्षी वृक्षप्राधिकरण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर ७ हजार ६०० झाडांच्या फांद्या तोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यामध्ये आतापर्यंत ४ हजार ५०० झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या असल्या तरी अद्याप ३ हजारांपेक्षा अधिक फांद्या तोडायच्या अजूनही बाकी आहेत. यावर्षी पाऊस महिनाभर उशिराने सुरू झाला. मात्र तरीही फांद्या छाटणीचे काम पावसाळ्यापूर्वी का पूर्ण झाले नाही, अशा महत्त्वाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
२४ तासांत ११० झाडे कोसळली
मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाण्यात २४ तासांत ११० झाडे कोसळली आहेत. तर अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे वेळेत झाडांच्या फांद्यांची छाटणी न झाल्याने मोठमोठी झाडे तसेच फांद्या पाडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे वृक्षप्रेमींनी सांगितले.
वृक्षप्राधिकरणाविरोधात शिवसेनेचा एल्गार
ठाणे पालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाच्या ढिसाळ आणि भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. महानगर संघटक महेश कदम यांनी चंदनवाडी येथील शिवसेना शाखेपासून पालिका मुख्यालयापर्यंत अंगावर झाडांच्या फांद्या लपेटून पायी दिंडी काढली. एकीकडे झाडे कोसळून ठाणेकरांचा जीव जात आहे. तरी वृक्षप्राधिकरण सुस्त आहे. पैशांच्या मलिद्यासाठी वेळेवर फांद्या छाटणीचे काम होत नाही तेव्हा आमच्या सहनशीलतेचा अंत का पाहता, असा सवाल शिवसैनिकांनी केला. या आंदोलनात शहरप्रमुख अनिश गाढवे, ओवळा-माजिवडा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, माजी नगरसेवक संजय तरे, महेश्वरी तरे, संजय दळवी, प्रमिला भांगे, विभागप्रमुख राजू शिरोडकर, प्रशांत सातपुते, शाखाप्रमुख राजू महाडिक, अमोल हिंगे, तानाजी कदम, प्रवक्ते तुषार रसाळ, संतोष शिर्के, संगीता शिर्के, सुनंदा देशपांडे, विकास काळे, सौरभ निकम, एकनाथ अहिरे, हरिश्चंद्र काळे आदी उपस्थित होते.




























































