
पोर्तुगालच्या पराभवानंतर जगाचं लक्ष निकालापेक्षा ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चेहऱयावर जास्त होतं. हा त्याचा अखेरचा वर्ल्ड कप सामना ठरण्याची शक्यता असल्याने चाहत्यांना अश्रूंचा महापूर अपेक्षित होता, पण रोनाल्डो निर्विकार चेहऱयाने मैदान सोडताना दिसला. अमेरिकेतील स्टेडियमपासून लिस्बनपर्यंत पोर्तुगीज चाहत्यांसाठी तो क्षण पराभवापेक्षा एका युगाच्या समाप्तीचा होता. काही चाहत्यांसाठी स्पेनने सामना जिंकला, पण काळाने त्यांचा राजा हिरावून नेला.
स्पेन–पोर्तुगाल एकत्र…
दोन कट्टर फुटबॉल शेजारी मैदानावर एकमेकांचा जीव घेत होते, पण बालोगन प्रकरणात काही स्पॅनिश आणि पोर्तुगीज चाहत्यांनी एकाच सुरात फिफावर नाराजी व्यक्त केली. अमेरिकन स्ट्रायकरवरील बंदी स्थगित करण्याचा निर्णय सर्वांसाठी समान नियमांच्या तत्त्वाला धक्का असल्याची भावना व्यक्त झाली. म्हणजे मैदानावर स्पेन विरुद्ध पोर्तुगाल, स्टँडबाहेर मात्र दोघांचा सूर एकच. नियम सर्वांना वेगळा. फुटबॉलने काल अशी युती घडवली की युरोपियन मुत्सद्देगिरीलाही त्यांच्याकडून नोट्स घ्याव्या लागतील.
बेल्जियम थांबलं नाही
संपूर्ण दिवस फोलारिन बालोगनच्या वादग्रस्त पुनरागमनाची चर्चा होती. तो खेळणार की नाही, फिफाने निर्णय का बदलला, राजकीय हस्तक्षेप झाला का? या प्रश्नांनी सामन्यापूर्वीच वातावरण तापवलं. पण सामना सुरू झाल्यावर बेल्जियमने चर्चेला चार गोलांचं उत्तर दिलं.
बेल्जियमचा ‘ट्रम्प डान्स’
अमेरिकेला 4-1 ने हरवल्यानंतर बेल्जियमच्या खेळाडूंनी कथित ‘ट्रम्प डान्स’ करत विजय साजरा केल्याचे वृत्त चर्चेत आले.
फुटबॉलमध्ये गोलानंतर नाच नवीन नाही, पण पराभूत यजमान देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या शैलीची नक्कल करून साजरा केलेला विजय हा कालच्या रात्रीचा सर्वात खोडकर प्रसंग ठरला.




























































