व्हिएतनाममध्ये बोट उलटली,हिंदुस्थानी पर्यटकांना जलसमाधी! 32 पैकी 15 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांगल्या कामाचे बक्षीस म्हणून कंपनीने व्हिएतनाममध्ये सहलीसाठी पाठवलेल्या पर्यटकांवर काळाने झडप घातली. सागरी पर्यटनाचा आनंद घेत असताना अचानक त्यांची स्पीडबोट उलटली आणि या दुर्घटनेत 32 हिंदुस्थानी पर्यटकांपैकी 15 जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. इतर 17 पर्यटकांना वाचवण्यात यश आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सहलीला गेलेल्यांमध्ये बहुतेक जण तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळम्मधील होते.

सहलीला गेलेल्या पर्यटकांचा समूह लाव्हा मोबाईल या कंपनीशी संबंधित होता. चांगली कामगिरी केल्यामुळे कंपनीने त्यांना व्हिएतनाम सहलीची भेट दिली होती. व्हिएतनाम येथील थ्रीलँड ट्रॅव्हल या कंपनीने ही सहल आयोजित केली होती. मोबाईल कंपनीचे वितरक, मोठे विक्रेते तसेच एजंटांना या सहलीवर पाठविण्यात आले होते. ‘साई व्हिएतनाम’ या स्थानिक कंपनीकडे यासंदर्भातील काम देण्यात आले होते. व्हिएतनाममध्ये पोहोचल्यानंतर पर्यटकांचा हा समूह स्पीड बोटीने तेथील प्रसिद्ध फू क्वोक बेटावर गेला होता. तेथून परतताना किनारपट्टीपासून अवघ्या 400 मीटर अंतरावर बोट उलटली. बोटीवर पर्यटक आणि चालकासह 36 जण होते. त्यापैकी 15 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. काही जण पोहून किनाऱ्याला पोहोचले. बोट धोक्यात आल्याचे लक्षात येताच सर्वांनी आरडाओरड सुरू केली. बचावासाठी हाका दिल्या. त्यांच्या हाका ऐकून जवळपासच्या बोटीतील काही जणांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बोट उलटली होती. हा प्रकार लक्षात येताच कोस्ट गार्ड आणि व्हिएतनामच्या नौदलाने बचाव कार्यासाठी धाव घेतली. त्यांनी कसेबसे तग धरून असलेल्या पर्यटकांना वाचवले. मात्र, 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेनंतर व्हिएतनाममधील हिंदुस्थानी दूतावासाने मदतीसाठी हेल्पलाईन जारी केली. बोटीत प्रवास करणाऱ्या सर्व 15 जणांची नावेदेखील जाहीर केली आहेत. मृतांमध्ये 10 जण तामिळनाडूतील असून आंध्र प्रदेशचे तीन आणि केरळमधील दोघांचा समावेश आहे. बोट उलटल्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना वेळेवर मदत मिळावी यासाठी सरकारने त्वरित योग्य ती पावले उचलावीत, असे आवाहन राहुल गांधी आणि खरगे यांनी केले आहे.

निष्काळजीपणा भोवला

बोट उलटण्यामागील नेमके कारण कळले नाही. मात्र मोठय़ा लाटा उसळल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पर्यटकांनी लाईफ जॅकेट घातलेले नव्हते, अशी माहिती बचाव कार्यातील कर्मचाऱ्यांनी दिली. बोट उलटल्यानंतर सर्व पर्यटक बोटीखाली अडकले.

फू क्वोक बेट हिंदुस्थानींचे आवडते ठिकाण

फू क्वोक बेट हे सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. व्हिएतनाम सरकारने हा भाग विशेष आर्थिक झोन म्हणून जाहीर केला आहे. तेथील पांढरी वाळू असलेले किनारे, स्वच्छ समुद्र, कोरल रीफ डायव्हिंग इत्यादींसाठी या परिसरातील लहानमोठी बेटे प्रसिद्ध आहेत. तेथे विदेशी पर्यटक व्हिसाशिवाय 30 दिवस राहू शकतात. या ठिकाणच्या पर्यटनाचा खिशालादेखील ताण पडत नाही. त्यामुळे मोठय़ा संख्येने हिंदुस्थानी नागरिक तेथे पर्यटनासाठी येतात.