शिवसैनिकांनी `जलजीवन’च्या पाइप चोरीचा डाव उधळला; एकास पकडले, सात फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ठेवण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या डी. आय. पाइपवर चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकांनी हा डाव उधळून लावला. यात एका आरोपीला पकडण्यात यश आले असून, त्यांचे सात साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. ही घटना आज मध्यरात्री वरोडी पठार येथे घडली.

एसटीएम इन्फ्रा प्रा. लि. कंपनीकडे जलजीवन मिशनच्या कामासाठी ठेवण्यात आलेले डीआयके-९चे १५० एमएमचे पाइप आयशर टेम्पोमध्ये भरून नेले जात असल्याची माहिती शिवसैनिक रंगनाथ फटांगरे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ कंपनीचे सुपरवायझर चेतन अरुण बेडसे यांना माहिती दिली. त्यानंतर शिवसैनिक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत वाहनाचा पाठलाग केला. संदीप भागवत, कृष्णा कोठवळ यांनी पुणे-नाशिक महामार्गावर आयशर टेम्पो अडविला. वाहनातून सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे डीआयके-९चे ४० पाइप जप्त करण्यात आले.

वाहनचालक इरशाद अलीशेर खान (रा. फरीदाबाद, हरियाणा) याला पकडण्यात आले, तर त्याच्यासोबतचे सात जण फरार झाले. याप्रकरणी चेतन अरुण बेडसे (वय ३८, रा. घुलेवाडी) यांनी घारगाव पोलिसांत फिर्याद दिली असून, इरशाद अलीशेर खान व त्याच्या सात अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.